महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा बारामती मतदारसंघांतील महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा!

इंदापूर, दि. २३ एप्रिल – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करत सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देवून न थांबता सुनेत्रावहिनींच्या ऐतिहासिक विजयाचे वाटेकरी होवू अशी ग्वाही या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला, या पाठिंब्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची ओळख निर्माण झाली आहे तसेच या पक्षाने बेरोजगार तरुणांना अनेक शासकीय उपक्रमातून रोजगार प्राप्त करून दिला आहे त्यामुळे या पक्षाची महाराष्ट्रभर मोठी ताकद वाढलेली दिसून येते.

अजितदादांच्या कामाची पद्धत सर्वज्ञात आहे. जात-पात, गट-तट न पाहता आलेली व्यक्ती आपलीच आहे असे समजून अजितदादा जनतेची कामे करत असतात. त्यांच्या कामाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आज सर्व घटकातून पाठिंबा मिळत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सर्वांनी एकजुटीने काम करुन घड्याळाचे चिन्ह तळागाळात पोहोचवण्याचे आवाहन करत तुम्ही दिलेल्या हाकेला आम्हा उभयंतांकडून तत्पर प्रतिसाद मिळेल असेही त्यांनी नमूद केले.

आमदार दत्तात्रय भरणे यांनीही कार्यकर्त्यांना कधीही अंतर दिले जाणार नाही अशी ग्वाही देत सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. अजितदादांनी नेहमीच सामान्य जनतेच्या प्रश्नांना महत्व दिले आहे. कोणतेही काम असले की वेळ न दवडता ते पूर्ण करण्यावर अजितदादांचा भर असतो. आमच्या अडचणी सोडवण्यासाठी अजितदादां सारख्याच नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे या पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे यांनी यावेळी सांयावेळी यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजयभैय्या सोनवणे, सोलापूरचे दीपक चंदनशिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,रेहाना मुलाणी, साधना केकाण, सचिन सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *