मौजे शहा येथील घरकुल घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्याचा उर्मटपणा.

ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांची भुमिका संशयास्पद.

इंदापूर : प्रतिनिधी

मौजे शहा येथील घरकुल घोटाळा प्रकरणात स्थळ पाहणीसाठी आलेले विस्तार अधिकारी संजीव मारकड यांनी तक्रारदारास उर्मटपणे उत्तरं दिली.

तक्रारदाराच्या अर्जाचे अनुषंगाने इंदापूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी खुडे साहेब यांच्या आदेशावरून स्थळ पाहणीसाठी मौजे शहा (ता. इंदापूर) येथे उपस्थित राहिले. परंतु ज्या ठेकेदाराचे कामाचे विरोधात तक्रारी केल्या गेल्या होत्या त्या ठेकेदाराचे गाडीतच बसून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजीव मारकड हे स्थळ पाहणीसाठी गेल्याने त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सदर प्रकाराबाबत अर्जदाराने मारकड यांस विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तक्रारी अर्जाचे अनुषंगाने स्थळ पाहणी करण्याची विनंती तक्रारदाराने केली असता “मला काय एवढेच काम आहे का?” असे उर्मटपणे उतर दिले. तसेच कोणत्या कामाविषयी संशय आहे. याबाबत तक्रारदारास विचारणा करून एका कोऱ्या कागदावर ते मुद्दे लिहून घेऊन त्यावर तक्रारदाराची सही घेतली आणि स्थळ पाहणी झाल्याचा बनाव करून गटविकास अधिकारी यांना नेहमीप्रमाणे अंधारात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले. त्यामुळे अर्जदाराने “फक्त एक ते दोनच ठिकाणी चला मी भ्रष्टाचार कसा झाला आहे हे तुमच्या निदर्शनास आणून देतो.”अशी पुन्हा पुन्हा विनंती केली तेव्हा ते लाभार्थ्यांकडे चौकशीसाठी तक्रारदाबरोबर गेले.

स्थळ पाहणीसाठी गेले असता ज्या घराचा पहिला हप्ता (फौंडेशन लेवल) सोडला आहे त्या लाभार्थ्याने सदर ठिकाणी साधा पाया सुध्दा खोदला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच दुसर्‍या लाभार्थ्याची चौकशी केली असता सदर लाभार्थ्याने घराचे हप्ते घेऊनही जुने घर दाखवले. यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला असता त्याकडे मारकड यांनी दुर्लक्ष केलेच परंतु तत्पूर्वी स्थळ पाहणीसाठी ग्रामसेवक उपस्थित असताना त्यांना कोणत्या लाभार्थ्याचे कोणते घर आहे हे अधिकारी आणि तक्रारदार यांस दाखवता आले नाही.

तक्रारदार यांनी विस्तार अधिकारी यांना घरकुलाचे हप्ते काढण्यासाठी दिलेले फोटो आणि आताचे जिओ टॅगिंग चे फोटो काढून यामधील तफावत तपासण्याची विनंती केली असता विस्तार अधिकारी यांनी त्यास नकार दिला.

विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या संशयास्पद भुमिकेमुळे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि लाभार्थी तसेच ठेकेदार यांचे मध्ये आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा संशय तक्रारदार यांनी वर्तवला आहे. विस्तार अधिकारी आणि वडापुरी गणातील एका नेत्याचे खुप घनिष्ठ संबंध असल्या कारणाने विस्तार अधिकारी भ्रष्टाचारास खतपाणी घालत असल्याचाही तक्रारदारास संशय आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांची लवकरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे तक्रारदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *