निमसाखर, दि. २५ निमसाखर, ता. इंदापूर येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक दाखवत शेतकऱ्यांना माहिती दिली.
मातीचा नमुना घेताना सदर जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इ. यावरून विभागणी करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात. सदर जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक या प्रमाणे एकरी ७ ते ८, १५-२० से.मी. खोलीचे इंग्रजी ‘व्ही’ (V) आकाराचे खड्डे घेतात. खड्डयातील माती बाहेर काढून टाकून ‘व्ही’ खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घेतात. अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा केले की ते एका स्वछ पोत्यावर एकत्र करतात. सदर मातीचे हाताने चार भागांत विभागणी करून समोरा-समोरील दोन भाग बाजूला काढून टाकतात. उरलेले दोन भाग एकत्र करतात. वरील विभागणी पद्धत मातीचा नमुना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करतात. ती अर्धा ते एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात.
माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो.
सदर प्रात्यक्षिक हे बर्गेवस्तीवर पार पडले याप्रसंगी कृषी सहायक श्रद्धा घोडके , राजेंद्र पवार, लता बर्गे , बबन बर्गे ,स्वाती देवकर व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषीदुत योगेश घोडे, ऋषिकेश बनसोडे, शंतनु गावंडे, प्रथम बिरादार, चैतन्य भोसले, अनंत हरक, ओमकार भिलारे, नितांत भोसले हे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांच्या व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.