आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी तब्बल ९४ हजार ८८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडल्या.
मोफत वीज आणि सोयाबीन व कापूस पिकांसाठी प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदानासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.
*प्रमुख मागण्या*
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : २५ हजार कोटी
*नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : ५०६०कोटी
*मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना : २९३०कोटी
*सहकारी कारखान्यांना मार्जिन मनी लोन : २२६५कोटी
*पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांना वाढीव मानधन : १८९३.२४कोटी
*सोयाबीन, कापूस अनुदान : ४१९४.६८कोटी
*श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना : ३६१५.९४ कोटी
*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी प्रतिपूर्ती*
राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या क्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी व प्रतिपूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागाने २२ कोटी ५७ लाख ९७ हजार रुपयांची मागणी केली आहे. उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी ८२९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. मात्र अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी ही योजना केवळ निवडणुकीपुरती असल्याची टीका केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.