लाडकी बहीण योजनेबाबतची एक मोठी अपडेट आहे. महिलांना रांगेत उभे राहण्याचा होणारा त्रास आणि तहसील कार्यालयावरील होणारी गर्दी थांबवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ही योजना घराघरात पोहोचवण्यासाठी आता सातारा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर प्रचंड गर्दी झाली आहे. रोजच ही गर्दी होत असल्याने तहसील कार्यालयातही कामाचा लोड वाढला आहे. तसेच सर्व्हर डाऊन होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे दिवसभर रांगा लावून सर्व्हर डाऊन झाल्याने घरी जावं लागत असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोलमजुरी सोडून या महिला तहसील कार्यालयात येत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची आणि रांगा लावण्याची गरज पडणार नाहीये.
राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना अर्ज करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आम्ही ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सातारा पॅटर्न राबवणार आहोत. या पॅटर्ननुसार आमची पथके घरोघरी जाणार आहेत. घरोघरी जाऊन शक्ती अॅपवर अर्ज भरून घेणार आहेत. त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांना कुठे जावं लागणार नाही, कुठेही अर्ज करण्याची गरज पडणार नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले. सोमवारपासून त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.