Pune Porsche Accident Local MLA Post: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलीशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत एका जोडप्याचा मृत्यू झाल्याचं प्रकरण सध्या राज्यभरामध्ये चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला असून या अल्पवयीन मुलाच्या हातून हा अपघात घडला त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलगा अल्पवयीन असताना त्याला कार चालवण्याची परवानगी दिल्याचा ठपका ठेवत ‘ब्रह्मा ग्रुप’चा मालक असलेल्या विशाल आगरवालला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. टिंगरे यांनीच या अल्पवयीन मुलाला लवकर जामीन मिळावा म्हणून मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याचा दावे करण्यात आले. सोशल मीडियावरही टिंगरे यांच्या नावाची चांगलीच चर्चा दिसून आली. असं असतानाच आता टिंगरेंनी आपली बाजू एका पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे.
नेमके काय दावे करण्यात आले या आमदारासंदर्भात?
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी टिंगरे हे मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बसून असल्याचा आरोप केला. टिंगरे यांचे अग्रवाल यांच्याशी व्यवसायिक हितसंबंध असल्याचाही दावा करत सोशल मीडियावरुन बरेच दावे करण्यात आले. यावर आता टिंगरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ‘कल्याणीनगरमध्ये काल (19 मे 2024) रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो,’ असं म्हणत टिंगरेंनी मरण पावलेल्यांबद्दल निस अवधिया, अश्विनी कोस्टा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
गैरफायदा घेण्याचा प्रयत्न
टिंगरे यांनी पुढे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. “या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं मात्र विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे,” असं म्हणत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
