नायलॉन मांजापासून पर्यावरणाला धोका….
इंदापूर प्रतिनिधी/ संतोष निकम
वालचंदनगर : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलिस ठाण्याकडून पतंग किंवा वावडी उडवण्यासाठी सर्रास वापरला जाणारा आणि अत्यंत धोकादायक असलेला नायलॉन मांजा वापरण्यावर, खरेदी करण्यावर किंवा विक्री करण्यावर कठोर मनाई केली आहे. अशी माहिती वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दंगे यांनी सांगितले.
या वेळी बोलताना ते म्हणाले की,
नायलॉन मांजाचा वापर बेकायदेशीर असून यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तो वापरणे टाळावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
धोकादायक सामान्य मांजापेक्षा नायलॉन मांजा अत्यंत मजबूत असतो. हवेत पतंग उडवताना तो तुटल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गळ्याला अडकून गंभीर इजा होऊ शकते, प्रसंगी जीवही जाऊ शकतो.
महाराष्ट्र राज्यात नायलॉन मांजाची विक्री आणि वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. याचे उल्लंघन करणे कायद्याने गुन्हा आहे.
नायलॉन मांजा पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. तो सहजपणे कुजत नाही आणि अनेक वर्षे पर्यावरणात तसाच पडून राहतो, ज्यामुळे प्रदूषण वाढते.मानवी जीवनासोबतच पक्षी आणि प्राण्यांसाठीही नायलॉन मांजा जीवघेणा ठरतो. यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होतात किंवा त्यांचा जीव जातो.
नायलॉन मांजाची खरेदी किंवा विक्री पूर्णपणे टाळावी, व पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये. जर कोणी नायलॉन मांजा वापरत असेल किंवा त्याची विक्री करत असेल, तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. असे पोलिसांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे:
वालचंदनगर पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि जड्ड्यांवर छापे टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि सुरक्षित पतंगबाजीसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डूणगे यांनी केले आहे.