इंदापूर : तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आडिअडचणी दुर करण्याची धडपड व गोरगरीब लोकांना योजनाचा लाभ घेता यावा यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन प्रयत्न करणारे बाभूळगाव येथील बापू मोरे यांच्या कामाची दखल घेत त्यांची राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघटनेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक इंदापूर येथील पंचायत समितीच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सभागृहात नुकतीच पार पडली.या बैठकीत बापू मोरे यांची सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा घोणे, श्रीहरी दराडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, विस्ताराधिकारी अजित घोगरे, हरी बंडगर, शशिकांत करडे व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरे यांच्या सामाजिक कार्याची तळमळ पाहता त्यांच्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासह संघटना मजबूत ठेवण्यासाठी त्याचबरोबर संघटनेतील समन्वय साधण्याची जबाबदारी तालुकाध्यक्ष या नात्याने सोपविण्यात आली असल्याचे अध्यक्ष घोणे यांनी सांगितले.
या वेळी तालुकाध्यक्ष बापू मोरे म्हणाले की, सर्व कर्मचारी गावची स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य, कर वसुली आदी जबाबदाऱ्या इनामे इतबारीने पार पाडत असतो. अशी कामे करताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहाणार आहे.