इंदापूर शहरातील कार्यकर्त्याचे नेत्याविषयी अनोखे प्रेम!
लाईव्ह महान्यूज : संतोष निकम… ✍🏻
इंदापूर : इंदापूर विधानसभेच्या रिंगणात तीन तगडे उमेदवार असल्याने, नेमके कोण इंदापूरचा आमदार होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. इंदापूर तालुक्यातील महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवाराच्या गोटात कोणालाही सांगता येत नव्हते की, कोण विजयी होणार, सर्वच संभ्रमात होते. त्यामध्ये तालुक्यात हजारो हौसी लोकांच्या पैजा, सट्टा, मटका असले चालू असताना, एक कार्यकर्ता मात्र टक्कल करणार यावर ठाम होता.

त्याचे झाले असे की, इंदापूर शहरातील बाबा चौक वडारगल्ली येथील महादेव चौगुले यांच्या पत्नीचे मानेच्या मणक्याचे शिरा जाम झाले होते. त्यातच हृदयविकार झालेला आणि पुण्यातील तज्ञ डॉक्टरांनी मणक्याकचे ऑपरेशन सांगितले. त्यासाठी तयारी सुरू झाली आणि रुग्णाला साखर निघाली, त्यामुळे ऑपरेशन तर होईल मात्र रुग्णाची आम्ही गॅरंटी देणार नाही. ऑपरेशनचा खर्च तर पाच लाख रुपये सांगितलेला होता.
त्यासाठी त्यांचा चिरंजीव, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले यांनी पुणे, मुंबई येथील सर्वच रुग्णालयात फेऱ्या मारून माझ्या आईला वाचवा म्हणून अक्षरशः डॉक्टरांचे पाय धरून रडले. त्यातच त्यांची अवस्था पाहून, त्यांचे मित्र, आमदार दत्तात्रय भरणे यांचे समर्थक सुभाष डरंगे – पवार यांनी चौकशी केली असता, सर्व हकीगत त्यांना समजली. तात्काळ त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना फोन लावून थेट हकीगत सांगितली. भरणे मामा यांनी तात्काळ पुणे येथील प्रसिद्ध डी.वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांना संपर्क साधला.
सचिन चौगुले यांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः फोन करून आधार दिला. पुणे येथे रुग्णालयात आईला ऍडमिट करा असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल केले. तात्काळ भरणे यांचे स्वीयसहायक हेमंत पांढरे यांनी रुग्णाची भेट घेतली. डॉक्टरांना संपर्क केला. सर्व जुळवणी केली. रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना आधार दिला. तब्बल 32 दिवस रुग्ण रुग्णालयात असताना, त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि डॉक्टरांचा समन्वय सातत्याने दुसरे स्वीयसहायक तुषार तरंगे यांनी साधला.
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे आमच्या आईचा जीव वाचला म्हणून, वडारगल्लीतील चौगुले परिवारातील जवळपास दोनशे पेक्षा अधिक लोकांमध्ये चर्चा झाली. सर्वांनी आमदार भरणे यांचे आभार मानले आशीर्वाद दिले. त्याचवेळी तिरुपती बालाजीचे भक्त असलेले, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले यांनी तिरुपती बालाजीला नवस केला. दत्तात्रय मामा भरणे तिसऱ्यांदा आमदार व्होवू दे..! तिरुपतीला येवून केसदान करेल. तोच नवस त्यांनी मागील आठवड्यात त्यांचे मित्र रोहिदास जाधव, दादा शिंदे, प्रणव पटणे, गणेश रेडे यांच्यासोबत तिरुपतीला पूर्ण केला आणि नेत्याविषयी अनोखे प्रेम दाखवून दिले.