इंदापूरातील गोखळी येथिल गुरुकुल शिक्षण संस्थेच्या संस्थापकाचे अपहरण

इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ यांचे अपहरण करून लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तीन आरोपींना इंदापूर पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.

सदर प्रकरणात शिवम बाळू डोंबाळे, वैभव हरिभाऊ माळवे, संकेत आप्पा जळक (सर्व रा.तरंगवाडी ता.इंदापूर जि.पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारीवरून सविस्तर माहिती अशी की, दि.3 जुलै रोजी लक्ष्मण हरणावळ हे केस कापण्यासाठी जात असताना या तीन आरोपींनी त्यांना रस्त्यावर अडवून तुम्ही आम्हाला महिन्याला एक लाख रुपये द्या नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला बघून घेईन अशा प्रकारची धमकी दिली. त्यानंतर लक्ष्मण हरणावळ हे केस कापण्यासाठी तरंगवाडी येथील दुकानात गेले. पुन्हा आरोपींनी हरणावळ यांना गुरुजी तुम्हाला पैसे द्यायला जमतात का नाही ? असे म्हणत एक लोखंडी मुठ असलेले फायटर काढुन तुम्हाला कायमचा संपवून टाकेन अशा प्रकारची धमकी देत लक्ष्मण हरणावळ यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. नंतर जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रल्हाद देवकाते यांच्या खडी क्रेशर वर घेऊन जाऊन हरणावळ यांच्या  खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.

सदर घटनेची लक्ष्मण हरणावळ यांनी फिर्याद देताच इंदापूर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. 

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस हवालदार राजेंद्र काळे, गणेश डेरे, योगेश कर्चे आदींनी केली. पुढील तपास पोलिस हवालदार अक्षय गोफणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *