इंदापूर, ता. २१: उजनी पट्टयातील इंदापूर तालुक्यातील शहा, कांदलगाव, माळवाडी या भागात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या सुमारे ४० लाख रुपये किमतीच्या चार बोटी इंदापूर महसूल पथकाने कारवाई करीत उद्ध्वस्त केल्या.
इंदापूरसह माढा आणि माळशिरस तालुक्यातील उजनी पट्टचातील आणि भीमा नदी पात्रातील अनेक भागांमध्ये वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राममहसूल अधिकारी अशोक पोळ, कल्याणसिंह डुलत, धनाजी भोसले, राजश्री ढमे, पोलिस पाटील अरुण कांबळे, सुनील राऊत, प्रदीप भोई, बाळासाहेब कडाळे, मल्हारी मखरे यांचे पथकाने उजनी धरण पट्टयातील शहा, कांदलगाव व माळवाडी या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या तीन मोठ्या व एक छोटी बोट, अशा एकूण ४ बोटी स्पोटकच्या साह्याने नष्ट करीत पाण्यात बुडविल्या.